Monday, August 29, 2016

मनाचे सामर्थ्य

 मित्रांनो मनात प्रचंड प्रमाणावर सामर्थ्य असते, त्यास प्रकट करणे आपल्याच हातात असते.

गुजरात मध्ये 2001 साली झालेल्या भुकंपात वर्षभर लकव्याने अंथरूणावर खिळून राहिलेला रोगी समोर इमारती पडताना पाहून उठून जोरात पळत सुटला ही ताकत आली कोठुन ?

मनाच्या अंतरंगात प्रचंड ऊर्जा असते. मानसिक विचार हा आत्मप्रतिमा - स्वप्रतिमा तयार करत असतो. या आत्मप्रतिमेला सकारात्मक विचारांच्या आधारे सबल करता येते. कधी कधी या आत्मप्रतिमेला अज्ञानाने आपणच दुर्बल करून नैराश्याकडे जात असतो.

एक शेतकरी होता, त्याचा भोपळयाचा मळा होता. सहजच गंमत म्हणून त्याने वेलावर लटकणार्‍या एका लहानशा भोपळयावर एक काचेची बरणी बांधली, भोपळे काढताना त्यांना लक्षात आले कि बरणीतील भोपळा फक्त बरणीच्याच आकाराएवढाच वाढला. भोपळयाला ज्या मर्यादांनी आपण सिमित केले, त्या पलीकडे त्याची मजल जाऊच शकत नव्हती.

मनाचेही असेच होते. संकुचित व स्वार्थी - अशुध्द मन - दुर्बल असते. मनात काय विचार चाललेत - मन स्वतःबदद्ल किंवा एखादया घटनेबदद्ल काय विचार करत आहे यावर त्या कार्याची यशस्विता अवलंबून असते.

विचार शरीरात अनेक प्रकारचे स्त्राव व तरंग निर्माण करतो. एका माणसाला मृत्यूदंडाची शिक्षा दयावयाची होती. त्याच्यासमोर नाग आणला व त्या माणसाचे डोळे बांधून त्याला दोन पिना टोचल्या. नाग आपल्याला चावला या भितीनेच त्याच्या शरीरात अनेक नकारात्मक स्त्राव (विष) तयार होऊन श्‍वासाची गती इतकी वाढली कि तो मृत्यूमुखी पडला. नुसत्या दोन पिना तर टोचल्या होत्या, पण भयप्रद विचारांनी त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले म्हणून विचारांवर लक्ष ठेवून नकारात्मक विचारांना सकारात्मक केल्यास दुःखमुक्तीच्या रस्त्यावरचा प्रवास सुरू होतो.

युध्दातील लढवय्या हत्ती म्हातारपणी चिखलात रूतला. बराच प्रयत्न करून बाहेरच येता येईना. शेवटी मनाने खचून खाली बसला. माहूताने अनेक लोकांच्या सहाय्याने वेगवेगळया दोर्‍या-काठया वापरून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. तेथून गौतम बुद्ध जात असताना लोकांनी ही समस्या त्यांना सांगितली. बुद्धांनी लोकांना हत्ती हा पूर्वीचा युद्धलढवय्या असल्याने चिखलाच्या चारही दिशेला युद्धाचे वातावरण तयार करून युद्धनगारे वाजवण्याचा सल्ला दिला. या कृतीने नगार्‍याचा ध्वनी ऐकून हत्ती शरीराची हालचाल करून उठून जोरात मुसंडी मारून चिखलाच्या बाहेर पडला. हत्तीच्या आत चिखलातून बाहेर पडण्याची प्रचंड ऊर्जा मुळातच होती. फक्त तिला जागवण्याचे काम लोकांनी युद्ध नगार्‍यांच्या माध्यमातून केले.

म्हणून आपल्या आत असलेल्या प्रचंड ऊर्जेच्या स्त्रोताला जागवण्यासाठी सकारात्मक विचार करा व मनाची उभारी वाढवा.....

No comments:

Post a Comment