Tuesday, August 30, 2016

*प्रेम म्हणजे काय असते


💕💕💕💕💕💕💕💕
एका गावात एक मध्यमवर्गीय पती पत्नी राहात असतात. नुकतेच लग्न झालेले. मात्र एंजॉय करण्याच्या त्या दिवसात आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने हौस मौज, सिनेमा इत्यादी त्यांच्यासाठी अशक्यच होते. तरी एकमेकांवर नितांत प्रेम असल्याने संसार सुरळीत सुरू असतो. पत्नी दिसायला सुस्वरूप, केस तर इतके सुंदर आणि लांब होते की साक्षात सुकेशिनी !!
एकेदिवशी कामावर निघण्याची तयारी करताना अचानक पतीच्या घड्याळाचा पट्टा तुटला आणि घड्याळ जमिनीवर पडून बंद पडले. इतक्यात पत्नी त्याला "टाटा" करायच्या निमित्ताने आलेली असते, ती म्हणते, "अहो, माझा कंगवा सकाळीच तुटलाय. तुम्ही येताना नवीन घेऊन येता का ?"
यावर पती खिन्न आवाजात म्हणतो, "आधीच महिनाअखेर आहे. त्यात आजच माझ्याही घड्याळाने मान टाकलीय. तरी पाहतो प्रयत्न करून तुझ्या कंगव्यासाठी"
लांब केस असल्याने साधा कंगवा तिला उपयोगी नसायचा. थोडा भारीचा घेतला तरच केस विंचरणे सोपे जायचे. पण ?? महिनाखेरने सगळ्या विचारांवर पाणी पडले. ती नकळत थोडीशी दुःखी झाली.
तोही बिचारा खालमानेने कामावर गेला. दिवसभर तो बेचैन होता. प्रिय पत्नीचा कंगवा की आपले घड्याळ ?? व्दिधा मनस्थिती झालेली. शेवटी घरी निघताना तो घड्याळाच्या दुकानात जातो, आणि ते घड्याळ आहे त्या परिस्थितीत विकून टाकतो. आलेल्या पैश्यातून एक सुंदर कंगवा शिवाय तिच्या आवडीचे सुवासिक वासाचे तेल घेऊन तो निघतो.
घरी येतो, पत्नी दार उघडते, आणि त्याला धक्काच बसतो.
कारण तिने आपले इतके सुंदर केस चक्क कापून लहान केलेले दिसतात. त्याच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून ती सांगू लागते.
"अहो, नेंहमी या केसाचा हा खर्च आपल्याला परवडणार आहे का ? शिवाय हल्ली पार्लरमध्ये लांब केस विकत घेतात हे कळले. म्हणून आज दुपारी जाऊन केस कमी केले. आता खर्चही वाचला आणि काही रुपयेही मिळाले. त्यातून तुम्हाला एक साधेच पण नवीन घड्याळ आणले आहे. हे घ्या"
तिच्या हातून नवीन घड्याळ घेताना तो गहिवरला. काही न बोलता त्यानेही पिशवीतून तिच्यासाठी आणलेला कंगवा आणि तेल तिला दिले. आता मात्र तिला हुंदका आवरेना !! ती मुसमुसत म्हणाली, "केस कायमचे गेलेले नाहीत. पुन्हा वाढतील की, तुमचा कंगवा वाया जाणार नाही"
आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत घट्ट सामावले.
मन हलके झाले होते आणि दोघांचे डोळे मात्र नकळत पाझरत होते !!
***** :---- पती पत्नीच्या प्रेमामध्ये आर्थिक परिस्थिती हे कारण कधीच दुःखाचे ठरत नाही. ठरू देखील नये. त्याने तिची भावना जपावी, तिने त्याचे मन ओळखावे. सुंदर जगण्याला अजून काय हवे ???

No comments:

Post a Comment