Friday, September 2, 2016

भक्ती म्हणजे एकरुप होण्याची प्रक्रिया

भक्त ' या शब्दात मोठी गंमत आहे . मुळात भक्त म्हणजे काय ? तर जो विभक्त नाही . ' विभक्त ' म्हणजे ' डिपार्टेड ' असेल , तर ' भक्त ' याचा अर्थ एकरूप झालेला असा होतो .

अर्थात भक्ती म्हणजे एकरुप होण्याची प्रक्रिया . एकरुप होण्याकरता जवळ येण्याची गरज असते किंवा जवळ येणं ही एकरुप होण्याची पहिली पायरी समजू . अर्थात हे ' जवळ येणं' म्हणजे काय ? तर अंतर नाहीसं करणं . हे अंतर दोन प्रकारचं असतं . एक जे डोळ्यांना दिसतं , ज्याला ' फिजिकल डिस्टन्स' असं म्हणतात . 

देवळासमोरच्या रांगेतला शेवटच्या टोकाचा माणूस आणि गाभाऱ्यातली मूर्ती यांच्यात अंतर आहे . रांग संपली , तो गाभाऱ्यात पोहोचला . ' फिजिकल डिस्टन्स ' कमी झालं . पण आतलं अंतर ?? ज्याला ' इनर स्पेस ' म्हणतात . त्याचं काय? रांगेच्या शेवटच्या टोकाला येऊन तो उभा राहिला तेव्हा त्याचं साध्य होतं गाभाऱ्यात पोचण्याचं , देवाला पाहण्याचं .

तो त्या टोकाला उभा होता , पण मनाने मात्र गाभाऱ्यात होता .

मग रांगेत रमला . तिथल्या लोकांशी रुळला , राजकारणावर चर्चा केली . रांगेतला एकजण त्याचा व्यवसायबंधू निघालाय , एक महत्वाचं ' डील ' ठरलंय . तासाभरात जर बाहेर पडलो , तर आजच हे ' डील ' साध्य होईल . आता तो घड्याळाकडे पाहतो .

गाभाऱ्यातल्या देवाला विनवतो , रांग संपू दे ! लवकर ' डील ' होऊ दे ! पाच किलो पेढे देईन !......... साध्य बदललं !!!

मघाशी त्याचं साध्य होतं ' देव '. आता साध्य आहे ' डील '! देव हे फक्त साधन आहे . म्हणजे शरिराने जेव्हा तो गाभाऱ्यात पोहोचलाय , तेव्हा मनाने तिथून कित्येक किलोमीटर दूर असलेल्या त्या ' डील ' च्या ठिकाणी पोहोचलाय . भेट झाली , पण भक्त आणि भगवंताची नाही . कारण भक्त त्यापूर्वीच विभक्त झाला ....

प्रेम आणि भक्ती यातलं हेच साम्य आहे . दोन्हीचं अंतिम रूप हे विरघळून जाणं आहे . मीपण टाकल्याशिवाय विरघळता येत नाही . मला काय हवंय हे सांगण्यापेक्षा , तुला काय हवंय याचा विचार म्हणजे विरघळून जाणं ! यात मी , माझं , मला राहतच नाही . इथेच प्रेम आणि भक्ती एक होते . 

मीरा कृष्णमय होऊन गेली . मीरेचं अस्तित्वच राहिलं नाही . ते समर्पण होतं . पण म्हणून आज मीराबाई म्हणून डोळे मिटले तर कृष्णाचं रुप डोळ्यासमोर येतं . भक्तीचा अंतिम चरण ,
जवळ येण्याचं अंतिम रुप म्हणजे एकरुप होणं !

No comments:

Post a Comment